नाशिक : नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथे एका बंगल्यात 12 डिसेंबर रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी लूट केली होती. संशयितांनी सुरुवातीला बंगल्यातील कुत्र्याला गुंगीचे औषध पाजून घरात प्रवेश केला होता. बंदुकीचा धाक दाखवत सोन्या-चांदीचे दागिने आणि 8 लाख 50 हजारांची रोख रक्कम असा एकूण 17 लाख 34 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरांनी पळवून नेला होता. लूट करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात नाशिकच्या ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. लुटीतील 4 लाख 60 हजाराचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला असून यात चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. इतर दोन फरार साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
17 लाख 34 हजारांची लूट केल्याची कबूली :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ढकांबे शिवारातील रतन बोडके यांच्या बंगल्यात बारा डिसेंबरला मध्यरात्री सात संशयितांनी प्रवेश करत बंदुकीचा धाक दाखवत 28 तोळे सोन्याचे दागिने, साडेआठ लाख रुपये रोख अशी 17 लाख 34 हजारांची लूट केले होती. यानंतर पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखा व दिंडोरी पोलिसांवर सोपवला होता. यानंतर सखोल तपास करत माहितीच्या आधारे नाशिक येथून नैशाद शेख यास ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर मध्य प्रदेशातील साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकून 17 लाख 34 हजारांची लूट केल्याची कबुली दिली आहे.