मुंबई :नाशिक पदवीधरमतदार संघाच्या निवडणुकीत पक्षादेश झुगारल्या प्रकरणी काँग्रेसने सत्यजीत तांबे यांच्यासह डॉ. सुधीर तांबेंवर निलंबनाची कारवाई केली. तर दुसरीकडे ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या चौकशीच्या सूचना हायकमांडकडून आल्या आहेत. थोरात सत्यजीत तांबेचें सख्ये मामा आहेत. त्यामुळे काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील स्वतः महाराष्ट्रात येऊन थोरात यांच्याकडे नाशिकमध्ये उडालेल्या गोंधळाबाबत विचारणा करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पक्षांतर्गत नाराजी :नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने अधिकृत उमेदवार घोषित केले असताना मुलगा सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तांबे यांच्या एका पुस्तक प्रकाशनावेळी सत्यजीत तांबेंवर नजर असल्याचे सांगत गुगली टाकली. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यावेळी उपस्थित होते. मात्र, थोड्याच दिवसात नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबेंनी बंडखोरी अर्ज करत बहुमताने निवडून येण्यासाठी भाजपची मदत घेणार, अशी प्रतिक्रिया देत खळबळ उडवून दिली. पक्षांतर्गत नाराजी यानंतर उफाळून आली आणि तांबे पिता पुत्रांना निलंबित करा, या मागणीने जोर धरला. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, चौकशी लावली. त्यानंतर डॉ. सुधीर तांबे यांचे चौकशी होईपर्यंत तर युवक काँग्रेसचे अध्यक्षपद महत्त्वाचे पद असताना, सत्यजीत तांबेंनी केलेल्या गंभीर चुकीमुळे सहा वर्षासाठी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करत पिता- पुत्रांना दणका दिला.
मामा ही चौकशींच्या फेऱ्यात :विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना, बाळासाहेब थोरात पडले. त्यांचा हात फॅक्चर झाला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यादरम्यान, काँग्रेसने पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ्याच्या निवडणुका जाहीर झाल्या. काँग्रेसने अमरावती आणि नाशिक या दोन जागांवर हक्क सांगितला. महाविकास आघाडीच्या बैठकीत त्यावर एकमत झाले. ऐनवेळी नाशिकमध्ये बंडखोरी झाली. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे सत्यजीत तांबे यांचे सख्खे मामा. त्यामुळे तांबे पिता-पुत्रांच्या या प्लानिंगबाबत बाळासाहेब थोरात यांना कल्पना कशी नव्हती, असा सवाल उपस्थित झाला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बाळासाहेब थोरात यांना तांबेंच्या प्लानिंगची माहिती दिल्याचा गौप्यस्फोट केला होता. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने थोरातांची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, वरीष्ठ पातळीवरून थेट बाळासाहेब थोरातांच्या चौकशीचे आदेश आले आहेत. अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रभारी एच. के. पाटील यांना तशा सूचना दिल्या असून बाप - बेट्याप्रमाणे मामाला ही जाब विचारावा, असे सांगण्यात आले आहे.