नाशिक :पुणे संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून गोपनीय माहिती मिळविल्याच्या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचले आहेत. दहशतवादविरोधी पथकाने त्यांच्या नाशिक युनिटला दोन मोबाइल क्रमांक पाठवले असून, त्याद्वारे तपास करण्याची सूचना केली आहे. व्हॉट्सअॅप चॅटमध्ये दोन संशयित महिला असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी एटीएसने नागपूर येथील मोबाइल क्रमांकाद्वारे तपास केला असता, बेंगळुरू येथील हवाई दलाच्या अधिकाऱ्याचे प्रकरण समोर आले होते. त्यामुळे आता नाशिक येथील दोन मोबाइलचा वापर कोणाकडून केला जात आहे. याची माहिती एटीएस घेत आहेत.
काय आहे प्रकरण :काय आहे प्रकरण : पाकिस्तानी गुप्तचराला लष्कराची गोपनीय माहिती पाठवल्याच्या आरोपावरून डॉ. कुरुलकर यांना पुणे एटीएसने अटक केली आहे. यानंतर डॉ. कुरुळकर यांच्याकडून त्यांचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला. त्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे तांत्रिक विश्लेषणही करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या फोनवरून झालेला संपर्क आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादविरोधी पथकाच्या नाशिक युनिटला कुरुळकर यांच्या व्हॉट्सअॅप चॅट डेटामधील दोन संशयास्पद मोबाइल क्रमांकांची माहिती पुढील तपासासाठी देण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.