नाशिकमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ; काळजी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - nashik corona news
नाशिकमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे लॉकडाऊन सारखी परिस्थिती टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर हा सुरक्षा कवच म्हणून करा तसेच सुरक्षित अंतर व सॅनिटायर्झचा वापर करणे अत्यंत आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
नाशिक -जिल्ह्यामध्ये स्पटेंबरमध्ये कोरोनारुग्णांची संख्या जवळपास ११ हजार होती. त्यानंतर कोरोना नियमांच्या पालनानंतर रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली होती. मात्र, आता पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून गेल्या दोन-तीन दिवसात २०० ते ३०० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या १५४४ पर्यंत पोहोचली आहे. कोरोनाचा हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतःहून जास्तीत जास्त काळजी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
मास्क लावा आणि लॉकडाऊन टाळा
गेल्या वर्षभरापासून आपण सर्व कोरोनाशी लढा देत आहोत. गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये आपल्याला थोडी आशा निर्माण झाली होती, की आपण या संकटातून लवकरच बाहेर पडू. परंतू आज परिस्थिती बदलत आहे. आपल्या निष्काळजीपणामुळे गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये संसर्गामध्ये खूप लक्षणीय वाढ होताना दिसून येते आहे. त्यामुळे लॉकडाऊन सारखी परिस्थिती टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर हा सुरक्षा कवच म्हणून केला पाहिजे. तसेच याबरोबर सुरक्षित अंतर व सॅनिटायर्झचा वापर करणे अत्यंत आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
थेट सहभाग टाळा, सोशल मिडीयाद्वारे सहभागी व्हा
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सामाजिक कार्यक्रमात थेट सहभागी होण्यापेक्षा सोशल मिडीयाद्वारे संबंधित कार्यक्रमांचा आनंद घ्यावा. असे केल्याने कोरोनाचा संसर्ग तर रोखता येईलच याशिवाय आपण आपली सामाजिक जबाबदारीही पार पाडू शकतो. तसेच जेथे आपली उपस्थिती अनिवार्य असेलच अशा ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती
- एकूण कोरोना बाधित रुग्ण-१ लाख १९ हजार ३५४
- कोरोना मुक्त नागरिक-१ लाख १५ हजार ७२८
- उपचार घेत असलेले रुग्ण-१५४४
- मृत्यू- २०२८