नाशिक :असं म्हणतात आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाला प्रेम होतं. पण ते प्रेम प्रत्येकालाच मिळतं असं नाही. असंच काहीसं एशियाड सर्कसमध्ये जोकरची भूमिका करणाऱ्या साहिल बद्दल म्हणता येईल. साहिल गेल्या आठरा वर्षापासून लोकांना आपल्या कलेच्या माध्यमातून आनंद देण्याचे काम करत आहे. मात्र प्रेमभंग झाल्याने त्याच्या आयुष्यात दुःखाची किनार आहे.
मेरा नाम जोकर :मेरा नाम जोकर या चित्रपटाच्या माध्यमातून शो मॅन राज कपूर यांनी जोकरच्या जीवनाचा प्रवास मांडला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. जोकरच्या जीवनात येणारे प्रसंग प्रेक्षकांना मनाला चटका लावून गेले होते. या चित्रपटात जोकरची भूमिका करणाऱ्या राज कपूर यांना प्रेम मिळालं नव्हतं,असंच काहीसं एशियाड सर्कस मध्ये जोकरची भूमिका साकारणाऱ्या साहिल शेख यांच्या बाबत घडलं आहे. साहिल मूळचे बिहार येथिल आहे. उंची कमी असल्याने त्यांना जीवनात अनेक संघर्ष करावा लागला आहे. घरात आई, वडील, दोन बहिणी असा त्यांचा परिवार आहे. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांनी सर्कसमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता. आज ते गेल्या अठरा वर्षांपासून सर्कसमध्ये येणाऱ्या आबाल वृद्ध प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे.