नाशिक - इगतपुरी मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकार यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षात येण्यासाठी संपर्क केल्याचा खळबळजनक आरोप खोसकर यांनी केला आहे. मात्र, मी त्यांना घरी नसल्याचे सांगत परतवून लावले. तसेच आपण काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून आपण कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच भाजप आमदारांना आमिष दाखवत असल्याचा आरोप केला होता.
हेही वाचा - काँग्रेसच्या आमदारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न, म्हणून आमदार गेले जयपूरला
भाजपकडून विरोधी पक्षाचे आमदार फोडण्यासाठी कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केला होता. तसेच शिवसेनेनेही आपल्या आमदारांना 50 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचे म्हटले आहे. त्यावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. काँग्रेसने आपले काही आमदार राजस्थानला (जयपूर) हलवले आहेत.