नाशिक -सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बुधवारी न्यायालयाने मोठा निर्णय दिला. मराठा आरक्षण प्रकरण न्यायालयाने घटनापीठाकडे वर्ग केले असून मराठा आरक्षणास तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे आता पाच न्यायाधीशांचा समावेश असलेले घटनापीठ मराठा आरक्षणावर सुनावणी करणार असल्याने मराठा आरक्षणाचे भवितव्य आता घटनापीठाच्या निर्णयावरून ठरणार आहे. यामुळे मराठा समाजातील उमेदवारांना नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळणार असल्याने नाशिकमधील मराठा बांधवांनी नाराजगी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी दीर्घकाळापासून करण्यात येत आहे. त्यानंतर मराठा समाजाने काढलेले मुक मोर्चे आणि नंतर झालेल्या तीव्र आंदोलनानंतर तत्कालीन सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या विषयावरुन पुन्हा न्यायालयीन लढाई सुरू झाली. उच्च न्यायालयातील सुनावणीत मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहोचली होती. तेव्हापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबतची सुनावणी सुरू आहे.