नाशिक- भाजप नगरसेविका प्रियंका घाटे यांचा भाऊ रोशन घाटे यांचा उपचारा दरम्यान करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मानवता क्युरी रुग्णालयाची तोडफोड केली. या घटनेचा निषेध करत रुग्णालयाकडून आजपासून करोना रुग्ण घेण्यास नकार देण्यात आला आहे. तसेच आयएमए नाशिक शाखेतर्फे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची भेट घेत खासगी कोविड सेंटरला चोवीस तास पोलीस सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
खासगी कोविड रुग्णालयांना पोलीस संरक्षण द्या नाशिकच्या भाजप नगरसेविका प्रियांका घाटे यांच्या भावाचे सोमवारी (दि. 26 एप्रिल) रात्री कोरोनाने निधन झाल्यानंतर प्रियांका घाटे व त्यांच्या समर्थकांनी मानवता रुग्णालयाची तोडफोड केल्याचा प्रकार घडला. दरम्यान, या घटनेचा निषेध करत रुग्णालय प्रशासनाने कोरोना रुग्ण दाखल करून घेण्यास नकार होता.
रुग्णालयाची तोडफोड सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
रोशन घाटे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना मुंबई नाका येथील मानवता क्युरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे समजताच सोमवारी मध्यरात्री घाटे समर्थकांनी रुग्णालयाची तोडफोड करत, पार्किंगमध्ये असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या. हा सर्व प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर कुठल्याच कोरोना रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात येणार नाही, असा पवित्रा मानवता क्युरी सेंटर रुग्णालयाने घेतला आहे.
रुग्णालयाच्या संरक्षणासाठी खासगी कोवीड सेंटरला चोवीस तास पोलीस संरक्षण द्यावे
रोशन घाटे यांच्यावर योग्य उपचार झाले नाहीत. त्यांच्या उपचारा दरम्यान डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला, म्हणून रोशन यांचा मृत्यू झाला. त्यामुळे डॉ. राज नगरकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रोशन यांचे वडील किशोर घाटे यांनी केली आहे. या प्रकाराबाबत इंडियन मेडीकल असोसिएशन नाशिक शाखेतर्फे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये गेल्या चोवीस तासांत दोन रुग्णालयावर हल्ले झाले आहेत. यामुळे कोरोना काळातही सदैव कार्यरत असलेल डॉक्टर, आरोग्यसेवक यांच्यामध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णालयाच्या संरक्षणासाठी खासगी कोवीड सेंटरला चोवीस तास पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देताना आयएमचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांसह काही डॉक्टर उपस्थित होते.
फिरते भरारी पथक नेमणार - जिल्हाधिकारी
जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि अशा खेदजनक घटना घडत आहेत. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. आयएमएचे सर्व प्रतिनिधी मला भेटले. त्यांनी माहिती दिली की रुग्णाला सर्व उपचार दिले होते. पण, त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालया परिसरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली व रुग्णालयाची तोडफोडही झाली आहे. प्रशासनातील सर्व कर्मचारी, डॉक्टर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारामुळे दुसऱ्या रुग्णांवर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारांवर आळा बसण्यासाठी फिरते भरारी पथक नेमण्याचा सूचना जिल्हाधिकारी यांनी पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत.
हेही वाचा -नाशकात भाजप नगरसेविकेच्या भावाचा कोरोनाने मृत्यू, समर्थकांकडून हॉस्पिटलची तोडफोड