इगतपुरी (नाशिक) : गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन संशयित आरोपींना काही स्थानिक तरुणांनी 8 जूनला कसारा परिसरात बेदम मारहाण केली होती. मारहाणीनंतर तिघांपैकी एक व्यक्ती बेपत्ता झाला होता. आता ही बेपत्ता व्यक्ती इगतपुरी जवळील घाटणदेवी परिसरातील उंट दरीत मृत अवस्थेत सापडली आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने या आरोपींना 17 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गोवंश घेऊन जाणारा टेम्पो अडवून मारहाण : मिळालेल्या माहितीनुसार, 8 जूनला शहापूर तालुक्यातील विहिगाव येथून एका टेम्पोत तीन जण गोवंश घेऊन जात होते. यावेळी कारेगाव कडून आलेल्या 15 ते 20 जणांनी हा टेम्पो अडवून त्यांना मारहाण केली. टेम्पोतील तीन व्यक्तींपैकी अकील गुलाम गवंडी पळून गेला. उरलेल्या दोघांना या लोकांनी इगतपुरी जवळील घाटनदेवी मंदिरासमोर आणून पुन्हा मारहाण केली. टेम्पोतील लुकमान सुलेमान अन्सारी हा जीव वाचवण्यासाठी घाटनदेवी मंदिरासमोर असलेल्या उंट दरीच्या दिशेने पळाला. यानंतर या टोळक्याने टेम्पो व जखमी अतीश हर्षद पद्दी याला इगतपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.