नाशिक - अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडायचे असेल तर नाशिककरांना पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे पोलीस उप आयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले आहे. ईटीव्ही भारतशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना रस्त्यावर फिरण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. जीवनावश्यक व इतर आवश्यक सेवा बजावताना अथवा एखाद्या व्यक्तीला अत्यावश्यक कामासाठी रत्यावरून प्रवास करायचा असल्यास पोलिसांकडून परवानगी घेणे गरजेचे असणार आहे. आरोग्य सेवा, पोलीस व जीवनावश्यक वस्तू तसेच आपत्ती व्यवस्थापन निवारण काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच संचारबंदी काळात दवाखाना व वैद्यकीय सोयी यासारख्या अत्यावश्यक सेवेसाठी देखील हा नियम लागू आहे.
नागरीकांनी त्यांचे नाव, ठिकाण, मोबाईल क्रमांक, अडचणीचे स्वरूप, कोठून कोठे जाणार, कोणत्या तारखेला जाणार, वार, वेळ आणि ठिकाण यासोबतच स्वतःचे ओळखपत्र (आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदानकार्ड) ज्या दवाखान्यात जायचे आहे त्याची माहिती, पोलिसांनी दिलेल्या हेल्पलाईनवर व्हाट्सअॅप करायची आहे.