नाशिक Sudhakar Badgujar : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा दाऊत इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल प्रकरणात गुन्हे शाखेकडून तिसऱ्यां दिवशी चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडं बडगुजर यांच्याविरोधात नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात 33 लाख 68 हजार रुपये प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बडगुजर यांचा आरोप :सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपाकडून मला टार्गेट केलं जात आहे. तसेच चुकीच्या पद्धतीनं माझ्यावर गुन्हे दाखल करून मला मानसिक त्रास दिला जात आहे. रविवारी रात्री नोटीस न देताच अचानक पोलिसांनी माझ्या कार्यालयावर छापा टाकला. मी कुठलाही गुन्हा केला नसून, लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या आरोपात तथ्य आढळल्यास मी एसीबी कार्यालयातील अधीक्षकांच्या ऑफिसबाहेर आत्महत्या करेल, असा खळबळजनक खुलासा ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केलाय.
सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन आलेलं नाही : 2006 मध्ये स्थापन झालेल्या कंपनीतून मी निवृत्ती घेतली आहे. 2014 मध्ये दाखल केलेल्या अर्जावर 10 वर्षानंतर कशी जाग आली? पोलीस दबावाखाली काम करत आहेत. मला पोलिसांशी संघर्ष करायचा नाही. मात्र, त्यांनी चुकीच्या केसेस दाखल करू नये. आरोपात तथ्य आढळल्यास एसीबी ऑफिससमोर आत्महत्या करेल. सत्ता येत असते, जात असते, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच आलेलं नाही. सत्तेचा माज कुणीच करू नये, असं सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं आहे. वरील सर्व आरोप हे सुधाकर बडगुजर यांनी केलेले आहेत.
काय आहे प्रकरण? : सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात दिलेल्या पत्राच्या आधारे 'एसीबी'कडून चौकशी सुरू होती. या पत्रात 'बडगुजर अँड बडगुजर कंपनी'तून 2006 मध्ये निवृत्ती घेतल्याबाबत खोटी कागदपत्रे बनवले. मनपामध्ये 2007 पासून नगरसेवक व इतर पदे भूषवताना बडगुजर कंपनीला मनपाकडून विविध ठेके देत कंपनीच्या माध्यमातून 2007 ते 2009 या कालावधीत 33 लाख 69 हजार रुपये घेत आर्थिक फायदा केला. तत्कालीन मनपा आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या कार्यकाळात बडगुजर हे शिवसेनेचे नगरसेवक असताना त्यांनी पदाचा दुरुपयोग करत स्वतःच्याच कंपनीला कंत्राट दिल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. गेडाम यांच्या तक्रारीनुसार, 'एसीबी'कडून बडगुजर अँड बडगुजर या कंपनीची चौकशी करण्यात आली. या चौकशीचा अहवाल काही दिवसापासून गुलदस्तात असतानाच, एसीबीनं 17 डिसेंबरला रात्री उशिरा सरकारवाडा पोलिसात बडगुजर यांच्यासह तिघांविरोधात पदाचा दुरुपयोग करून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. यामध्ये बडगुजर यांच्यासह त्यांचे साथीदार सुरेश भिका चव्हाण, साहेबराव रामदास शिंदे यांचा समावेश आहे. वरील सर्व मजकूर तक्रारीत दिलेला आहे.
हेही वाचा -
- बडगुजरांवरील आरोपानंतर भाजपाचे मोठे नेते सलीम कुत्तासोबत? सुषमा अंधारेंनी दाखवला फोटो
- सलीम कुत्ताशी संबंधावरून सुधाकर बडगुजर यांची दोन तास चौकशी
- ठाकरे गटाच्या नेत्याची मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टी, नितेश राणेंनी विधानसभेत दाखवले फोटो; सुधाकर बडगुजर यांनी दिलं 'हे' स्पष्टीकरण