महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरून सुपारी देऊन पत्नीची हत्या...

परपुरुषासोबत अनैतिक संबंध ठेवत असल्याच्या संशयावरुन नवऱ्यानेच पत्नीची सुपारी देत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह तीन संशयित आरोपींना नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

By

Published : Jun 22, 2020, 3:23 PM IST

Husband kills wife by giving supari on suspicion of character in nashik
चारित्र्याच्या संशयावरून पतीने सुपारी देऊन केली पत्नीची हत्या...

नाशिक - पत्नी वारंवार सांगून देखील परपुरुषासोबत अनैतिक संबंध ठेवत असल्याच्या संशयावरुन नवऱ्यानेच पत्नीची सुपारी देत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह तीन संशयित आरोपींना नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


16 जूनला मंगळवारी चांदवड राहुड शिवारात मुंबई-आग्रा महामार्गालगत मैल स्टोनलगत असलेल्या नाल्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडल्याने पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसात या प्रकरणाचा तपास करत महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडल आहे. निता नारायण चित्ते (वय 49, रा. चित्ते प्लाझा, प्लॉट नंबर 01, गजपंथ म्हसरूळ, नाशिक) असे मृत महिलेचे नाव आहे.

पती नारायण शामराव चित्ते हे पत्नी इतर पुरुषांशी वारंवार अनैतिक संबंध ठेवते म्हणून तिच्या अशा वागण्याने त्रासून गेला होता. तिला त्याने वेळोवेळी समजावून सांगूनही तिच्या वर्तनात फरक पडत नव्हता. त्याचा राग मनात धरून नारायण चित्ते यांनी त्याचा जवळचा मित्र विनय निंबाजी वाघ (वय 52, गुलमोहर नगर म्हसरूळ) यांच्या मदतीने भरत देवचंद मोची उर्फ मोरे (28, रा. भीमनगर, उल्हासनगर ) यास पत्नी निताला जीवे ठार मारण्यासाठी 10 लाख रुपयांची सुपारी दिली होती.

मृत नीता ही रविवारी (ता. 14 जून) सकाळी पती नारायण चित्ते यास सांगून उत्तम नगर सिडको येथे माहेरी गेली होती. आरोपी भरत देवचंद मोरे यांनी त्याचा साथीदार वाहिद अली शराफत अली (रा. पंचशील नगर, उल्हासनगर) यांचेसह नीताला व्हॉट्सअपवर मेसेज करत विश्वासाने आडगाव नाक्यावरील उड्डाणपुलाजवळ बोलवले. नीताने आई-वडिलांना गुजरातला जाते असे सांगितले. आरोपी भरत मोरे याने नीताला नाशिक येथून स्विफ्ट कार ( क्र. एम एच 01, पी ए 5632) मध्ये बसविले व मुंबई-आग्रा महामार्गवर चांदवड लगत राहुड घाट परिसरात साडीने गळा आवळून जीवे ठार केले. पुरावा नष्ट करण्यासाठी मृत नीताचा मृतदेह महामार्गालगतच्या नाल्यात फेकून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी विनय वाघ याच्याकडून नाशिक येथे 5 लाख रुपये घेतले व उर्वरित रक्कम नंतर घेऊन येण्यास सांगितले.

यानंतर पती नारायण चित्ते याने बनाव करत पत्नी हरवल्याची तक्रार अंबड पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांना पती नारायणवर संशय आल्याने त्यांनी त्याची सखोल चौकशी केली असता खुनाचा उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी संशयित पती नारायण चित्ते, विनायक निंबाजी वाघ, (रा. नगर ) या दोघांना ताब्यात घेतले असून संशयित आरोपी भरत देवचंद मोची (रा. उल्हासनगर, शहाड) व चौथा संशयित साक्षीदार वाहिद अली शराफत अली या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

नारायण चित्ते, विनायक वाघ यांना न्यायालयात हजर केले असता दोघांना 30 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. तिसरा संशयित भरत देवचंद मोची उर्फ मोरे यास देखील पोलिसांनी अटक केली असून, चौथा साथीदार वाहिद अली शराफत अली याचा पोलीस शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details