सटाणा (नाशिक)- पत्नी चार वर्षांच्या मुलाला सोडून मित्राबरोबर घर सोडून निघून गेल्याने निराश झालेल्या पतीने फेसबुकवर चिठ्ठी पोस्ट करून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी आपल्या पत्नीस व तिच्या मित्राला शिक्षा करावी, अशी पतीने चिट्ठीत मागणी केली आहे. राहुल चव्हाण असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
उमराणे (ता. देवळा) येथील राहुल चव्हाण (पाटील) हा पदवीधर युवक अॅपे ही मालवाहू रिक्षा चालवून उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या घरी आई, पत्नी आणि 4 वर्षांचा मुलगा आहे. तो सोशल मीडियावरदेखील चांगलाच सक्रिय होता. त्याची पत्नी पूजा काही दिवसांपूर्वी आपल्या 4 वर्षांच्या मुलास सोडून एका युवकासोबत पळून गेली होती. त्यामुळे गेले चार दिवस राहुल अत्यंत खचला होता.
या घटनेमुळे समाजात काय चर्चा होईल? लोक काय म्हणतील, या विचाराने तो घराबाहेरदेखील पडला नव्हता. त्याच्या मनातील ही घालमेल कोणालाच कळली नाही. या तणावातच त्याने आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ती फेसबुकवर पोस्ट केली. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा झाली. अनेकांना त्याने खरेच आत्महत्या केली की गंमत केली, याची शंका आली. घरी चौकशी केल्यावर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.