नाशिक -त्र्यंबकेश्वरमधील वारूनसे मळ्यात ऊसाला विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. यामध्ये समाधान वारूनसे आणि सोनू वारूनसे यांच्या 6 एकर ऊसाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. अचानक लागलेल्या आगीत ऊस जळून खाक झाला आहे. शनिवारी सकाळी ही आग लागली.
एमएससीबीच्या हलगर्जीपणामुळेच लागली आग?-
दरम्यान या भागात शॉर्ट सर्किटमुळे आग लागणे हे नित्याचेच झाले आहे. ही आग एमएससीबीच्या हलगर्जीपणामुळेच लागली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतात वारंवार शॉर्ट सर्किट होत असतात. तक्रार करूनही एमएससीबीने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाईदेखील लवकर देण्यात यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
गेल्या महिन्यात तब्बल 27 एकरातील ऊस जळून खाक-
यापुर्वी गेल्या महिन्यात सोलापूर जिल्ह्यात उसाच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांचे घर्षण झाल्याने तब्बल 27 एकरातील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. पंढपरपूर तालुक्यातील शिरढोण येथील 10 ते 12 शेतकऱ्यांचे यामध्ये 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर शेतकऱ्यांच्या तत्परतेमुळे जवळपास 23 एकरातील ऊस आगीपासून वाचवण्यात आले आहे. महावितरण कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे तोडणीस आलेला ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.