नाशिक -आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. यंदा आवक घटल्याने किरकोळ बाजारात कांद्याला 150 रुपये प्रति कीलो इतका उच्चांकी दर मिळत आहे. अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादनात घट झाली आहे. आवक आणि मागणी यांच्यात मोठी तफावत असल्याने कांदा दर वाढले आहेत. तरी डिसेंबर अखेरपर्यंत हे दर असेच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील इतर पिकांसोबत कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. साठवून ठेवलेला उन्हाळी कांदादेखील संपत आला आहे. नवीन लाल कांदा बाजार पेठेत मुबलक प्रमाणात येण्यासाठी जानेवारीचा पहिला आठवडा उजाडणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दर जास्त असले तरी त्याचा फायदा मोजक्याच शेतकऱ्यांना होताना दिसून येत आहे. भाव वाढीचा जास्त फायदा किरकोळ कांदा विक्रेते आणि व्यापारी घेत आहेत.
हेही वाचा -कांदा आयातीचा निर्णय देशातील शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा - राजू शेट्टी