नाशिक - हाॅटेल व रेस्टारंट चालकांच्या मागणीनूसार वेळ मर्यादा सकाळी 8 ते रात्री 9, अशी करण्यात आली आहे. तर परमिटधारक मद्य दुकाने व बारसाठी वेळ मर्यादा सकाळी 11 ते रात्री 9 करण्यात आली आहे. इतर दुकाने सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहतील, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाणी वाटप संदर्भातही आज बैठक झाली. महापालिकेच्या मागणीप्रमाणे त्यांना पाणी देण्यात आले. जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा मुबलक असल्याने सर्वांना मागणीप्रमाणे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्री भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात सक्रीय रुग्ण संख्या कमी होत आहे. जिल्ह्यात 8 हजारात रेमडिसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहे. ऑक्सिजन पुरवठा देखील सुरळीत झाला. सध्या 50 मेट्रिक टन ऑक्सिजन रोज उपलब्ध होत आहे. विलोळी गावाजवळ होत असलेल्या नवीन ऑक्सिजन कंपनीकडून देखील येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळणार आहे. नाशिकचा मृत्यूदरही राज्यात कमी असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांपर्यंत गेला असल्याचे भुजबळ सांगितले आहे.
5 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व हॉटेल, कॅफे, रेस्टॉरंट, बियर बार सुरू करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने परवानगी देण्यात आली होती. मात्र, यावेळी सायंकाळी 7 वाजेपर्यंतच व्यवसाय सुरू ठेवण्याची अट घालून आल्याने व्यावसायिकांना ऐन ग्राहक येण्याच्या वेळेत व्यवसाय बंद करावे लागत होते. यामुळे प्रशासनाने वेळ मर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी व्यवसायिकांनी केली होती. दरम्यान, या मागण्यांची दखल घेत अखेर वेळ मर्यादा वाढवून देण्याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. शनिवारी (दि. 10 ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीनंतर माध्यमांसोबत संवाद साधत असताना त्यांनी ही घोषणा केली आहे. मात्र, कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सुचनाही त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा -महावितरणचा मनमाडकरांना वाढीव बिलाचा शॉक; ग्राहक संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा