नाशिक -चांदोरी येथे नारायण महाराज पटांगणाच्या बाजूला खंडेराव महाराज मंदिराजवळ तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत विकास कामासाठी खोदकाम करताना एक भुयार आढळून आले आहे. या भुयारामध्ये एक तळघर आहे. या तळघराची भिंत चुना आणि शिवकालीन विटांपासून बनवलेली आढळून आली आहे.
श्रीराम मंदिरापासून नदीपर्यंत भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते, तो हाच मार्ग असावा, अशी शक्यता गावकऱ्यांनी वर्तविली आहे. हा भुयार सदृश मार्ग शेकडो वर्षांपुर्वीचा असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या बद्दलची माहिती होताच अनेकांनी धाव घेऊन पाहणी केली. चांदोरी गावास अनेक ऐतिहासिक वारसा असून पुरातत्व खात्याने या सर्व गोष्टींचा विकास करावा. त्या माध्यमातून पर्यटनाचा माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्याबरोबर ऐतिहासिक माहिती समोर येऊ शकते, अशी भावना येथील गावकऱ्यांनी व्यक्त केली.