नाशिक - शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून तर भाजप उमेदवार डॉ. भारती पवार यांनी दिंडोरी मतदारसंघातून एकत्रित जिल्हाधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नाशिकच्या बी. डी. भालेकर ग्राऊंडपासून जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत भव्य शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
हेमंत गोडसे आणि भारती पवार यांचा लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल यावेळी जय भवानी, जय शिवाजीच्या जय घोषणाने परिसर दुमदुमून गेला होता. हजारोंच्या संख्येने शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते पक्षाचे झेंडे, बॅनर घेऊन रॅलीत सहभागी झाले होते. उमेदवारांचे अर्ज भरताना पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेनेचे संजय राऊत यांच्यासह आमदार राजाभाऊ वाजे, बबनराव घोलप, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, राहुल आहेर यांच्यासह शहर व जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
देशाला चांगले नेतृत्व मिळण्यासाठी मतदार मला संधी देतील - हेमंत गोडसे
ग्रामीण भागात प्रचारावर जोर देत असून मागील ४ वर्षात चांगले काम केलेले आहे. देशाला चांगले नेतृत्व मिळावे म्हणून यावेळीसुद्धा मतदार मला संधी देतील, असा विश्वास आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे फरक पडणार नाही. आतापर्यंतच्या नाशिकच्या इतिहासात मतदारांनी राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला संधी दिली आहे. याही वर्षी असे होईल, असे मला विश्वास असल्याचे शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे.
मागील निवडणुकीत भुजबळांवर कोणतेही आरोप नसताना त्यांचा पराभव झाला होता. यावेळी मात्र ते कुठे आणि कुठल्या कारणासाठी गेले होते हे मतदारांना चांगल्या प्रकारे माहीत असल्याचे म्हणत खासदार गोडसे यांनी भुजबळांवर अप्रत्यक्ष टीका केली.
ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडवणार - भारती पवार
भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण बंडखोरी करणार नाही असा मला विश्वास आहे. ते आमचे मार्गदर्शक असून ते आमच्या सोबत आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मला ग्रामीण भागातील प्रश्नाची जाण असून पाण्याचा मुख्य प्रश्न आहे. चांदवड, मनमाड, नांदगाव, येवला आदी भागातील पाण्याचा प्रश्न सोडवणार. तसेच कांदा आणि द्राक्ष अधिक निर्यात होतील, यावर जोर देणार असल्याचे यावेळी भारती पवार यांनी म्हटले.