नाशिक - दुपारी साडेतीन वाजल्यापासून नाशिक शहरासह गंगापूर धरण परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. अवघ्या दीड तासात धरण परिसरात 103 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे गटारी, नाले यांचे प्रदूषीत पाणी गोदावरी नदीत मिसळले असून गोदावरीला पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक पाण्याची पातळी वाढल्याने नदिवरील गाडगे महाराज पुलाखाली 8 ते 9 वाहने अड़कून पडली आहेत.
ढगांचा गडगडाट, सोसाट्याचा वारा अन् पावसाच्या जोरदार आगमनामुळे नागरीकांची अक्षरश: दाणादाण उडाली होती. यामुळे नाशिककरांना हवेतील गारव्याचा सुखद अनुभवही मिळाला. एकतर लॉकडाऊन त्यात उकाड्याने हैराण होताच अचानक आकाशात ढग दाटून आले. जोरदार पावसाने सगळ्यांना ओलेचिंब केले. शहराच्या मध्यवर्ती परिसरात दुपारच्या दरम्यान दमदार पावसाने हजेरी लावली. पहिल्याच पावसात नाशिक महापालिकेच्या पावसाळापूर्व तयारीचे पीतळ उघडे पडले. काही भागात तर पाण्याचे तळे साचल्याचे चित्र पहावयास मिळाले.