नाशिक - नाशिकमध्ये अपघात टाळण्यासाठी रस्त्यालगतची २९ वृक्षांची कत्तल करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्याला विरोध करण्यात आल्याने पर्यावरण तज्ज्ञ सुंदरलाल बहुगुणा यांना समर्पित 'हॅशटॅग चिपको नाशिक' ही चळवळ सुरू करण्यात आली आहे.
गंगापूर रस्त्यालगतची २९ वृक्षांची कत्तल करण्याचा घाट
नाशिक शहरात अपघात टाळण्यासाठी गंगापूर रस्त्यालगतची २९ वृक्षांची कत्तल करण्याचा घाट महापालिकेकडून घालण्यात आला आहे. त्यामुळे त्याला कडाडून विरोध करण्यासाठी पर्यावरण तज्ज्ञ सुंदरलाल बहुगुणा यांना समर्पित हॅशटॅग चिपको नाशिक ही चळवळ पुढे सरसावली आहे. उत्तुंग झेप फाउंडेशन संस्थेतर्फे रोहन देशपांडे, पर्यावरणतज्ञ अश्विनी भट, उदय थोरातसह सहकाऱ्यांनी विभागीय, मनपा आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिले आहे. त्यात वृक्ष प्राधिकरण समितीने सर्वोच्च व मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा अवमान न करता पालन करावे अन्यथा जिल्ह्यात सांकेतिक पध्दतीने आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करू नये
निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की, आमचा शासन, प्रशासनाला कोणताही विरोध नाही. मात्र, परस्परांमध्ये समन्वय नसल्याने गंगापूर रोड परिसरातील निरपराध वृक्षांचा बळी जाईल. तो थांबविण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. प्राधिकरणाने वृक्षतोडीविरुद्धच्या जनहित याचिकेचे व मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करू नये. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एका वृक्षाचे दरवर्षाचे मूल्य ९४५०० रुपये असते. वृक्षाच्या वयानुसार ते वाढत जाते. वृक्ष न तोडता त्याचे पुनर्रोपण करावे, अशा सूचना केल्या आहेत अलीकडेच राज्य शासनाने ५० वर्षांवरील वृक्षांना हेरिटेज दर्जा दिला आहे.त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी निर्देश दिले आहेत. यापूर्वीच्या सिंहस्थ काळात जवळपास २३२ वृक्ष महापालिकेने पुनर्रोपित केल्याची नोंद आहे. मात्र त्याबत विचारलेल्या प्रश्नांना अधिकृत उत्तरे देण्याचे टाळून माहिती अधिकाराचे उल्लंघन करण्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. रस्त्यांच्या दुतर्फा दर १० फुटांवर १० फूट उंच वाढलेले देशी ( स्थानिक) वृक्ष लावून जतन करण्याच्या १९७५ व २००९ च्या आदेशांचे पालन महापालिका करीत नाही, याकडेही निवेदनात लक्ष वेधले आहे.