नाशिक - दिंडोरी लोकसभा मतदार संघातून हरिश्चंद्र चव्हाण यांचा मुलगा समीर याने जिल्हाधिकारी कार्यालयातून अपक्ष उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे ते स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करणार, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. मात्र, उमेदवार म्हणून हरिश्चंद्र चव्हाण यांचे नाव नोंद वहीत लिहण्यात आले आहे. त्यामुळे भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण बंडखोरीच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण बंडखोरीच्या तयारीत - नाशिक
उमेदवार म्हणून हरिश्चंद्र चव्हाण यांचे नाव नोंद वहीत लिहण्यात आले आहे. त्यामुळे भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण बंडखोरीच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे दिंडोरी लोकसभा मतदार संघातून सलग ३ वेळा लोकसभेमध्ये प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी कापल्याने ते कमालीचे नाराज झाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपच्या राज्यातील नेत्यांवर टीकास्त्र सोडत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.
भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे सुपुत्र समीर चव्हाण यांनी अर्ज घेतल्याने प्रमुख प्रतिस्पर्धी भाजप व अन्य पक्षात खळबळ उडाली आहे. खासदार चव्हाण यांच्यासाठी कळवण, देवळा, सुरगाणा, पेठ, दिंडोरी, निफाड, येवला, चांदवड, नांदगाव तालुक्यातील सर्वपक्षीय मातब्बर पुढाऱ्यांनी मदत करण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा दिंडोरी मतदार संघात रंगली आहे.