नाशिक - किष्किंधा पीठाचे महंत गोविंदानंद यांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. हनुमानाचा जन्म किष्किंधा मध्येच झाला, असा दावा किष्किंदचे महंत गोविंदानंद ( Mahant Govindanand ) यांनी केला आहे. हनुमान जन्मस्थळावर कोणाशीही, कोणत्याही चर्चेसाठी तयार असल्याचा दावा गोविंदानंद यांनी ( Hanuman Birth Place Controversy ) केला. या चर्चेसाठी गोविंदानंद त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले असून त्यांनी नाशिकच्या महंत, पुरोहित, पुजारी, अभ्यासक यांना अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा पुरावा द्यावा, असे आव्हान त्यांनी केले आहे.
अंजनेरीचे ग्रामस्थ आक्रमक - हनुमंतांचे जन्मस्थान अंजनेरी की किष्किंधा हा वाद पेटला असून गोविंदानंद महाराजांविरोधात अंजनेरीतील गावकरी आक्रमक झाले आहे. गोविंदानंद महाराज यांनी अंजनेरी किल्ल्यावर येण्याचे आव्हान ग्रामस्थांनी दिले आहे. गोविंदानंद महाराज यांनी कर्नाटकातिल किष्किंधा पर्वत हनुमंताचे स्थान असल्याचा दावा केला असून त्यासाठी पुराव्यानिशी चर्चेची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे अंजनेरी गाम्रस्थ आक्रमक झाले आहे. अंजनेरीतील अंजनी माता मंदिरात गावकरी आणि साधूसंतांची बैठक झाली. अंजनेरी हेच जन्मस्थळ असून वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई देखील लढवण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण -नाशिकमधील अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला आहे. महंत गोविंदानंद त्र्यंबकेश्वर येथे हनुमानाच्या जन्मस्थानावरील वैज्ञानिक पुरावे आणि दाव्यांवर चर्चा करण्यासाठी आले आहेत. त्यांनी धर्मग्रंथ, वेद आणि पुराणांच्या संदर्भात दाखले देऊन जन्मभूमीच्या दाव्यावर पुढे येऊन चर्चा करण्याचे आवाहन त्यांनी केले. महंत गोविंदानंद स्वामी यांनी एकप्रकारे नाशिकच्या संत महंतांना अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. किष्किंधा मठाधिपतीने हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी नसून किष्किंधा असल्याचा दावा केला आहे.