दिंडोरी(नाशिक)- जिद्द, मेतनत, चिकाटी असेल तर ध्येयाला गवसणी घालता येते हे अगदी खरे आहे. यालाच सत्यात उतरवले आहेत ते दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव येथील सुनिता गायकवाड या दिव्यांग विद्यार्थिनीने. शेतात काबाडकष्ट करुन सुनिताने आज सहाय्यक विक्री कर अधिकारी पद मिळवले आहे.
अडाणी आई-बाप अन् शेतात काबाडकष्ट.. डीएड करुन शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सुनिताला शिक्षक भरतीमध्ये अपयश आले. मात्र, निराश न होता सुनिताने स्पर्धा परिक्षेची तयारी केली. मेहनतीने जीव आतून अभ्यास केला. ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या परिक्षेत दुसऱ्या प्रयत्नात सुनिताला यश मिळाले. सुनिता सहाय्य विक्री कर अधिकारी बनली.
सुनिता दिव्यांग असून घरासह शेतातील कामे करुन तीने आपले शिक्षण पुर्ण केले. सुनिताचे प्राथमिक शिक्षण कोचरगावात झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानून यशस्वी व्हायचचे ही खुणगाठ मनाशी बांधून सुनिताने अभ्यास केला. राज्य सेवेच्या माध्यमातून पुढील परिक्षा देऊन समाजसेवेचे काम करणार असल्याचे सुनिताने सांगितले आहे.
दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव येथील विमल व पोपट गायकवाड यांची मुलगी सुनिता. गायकवाड कुटुंबाकडे कोरडवाहू शेती. सुनिताचे आई-वडील दोघेही निरक्षर मात्र, सुनिताने शिक्षण घेऊन मोठं बनावे, असे त्यांना नेहमीच वाटायचे. गायकवाड कुटुंबात चार मुले व दोन मुली असून एक मुलगा वस्तीशाळेत शिक्षक आहे. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक हातभार लागला. कुटुंबातील सर्वात छोटी मुलगी म्हणजे सुनिता ही जन्मतःच दिव्यांग आहे. सुनिता लहानपणापासूनच जिद्दी व हूशार असल्यामूळे शाळेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायची.
सुनिताचे प्राथमिक शिक्षण कोचरगाव जिल्हा परिषद शाळेत पुर्ण झाले. तर माध्यमिक शिक्षण ज्ञानज्योती कन्या आश्रमशाळा तिल्होळी येथे झाले. बारावीत विद्यालयातून दुसरा क्रमांक सुनिताने मिळवला होता. बारावीनंतर डीएड साठी दिंडोरीत सुनिताने दोन वर्ष अभ्यासक्रम पुर्ण केला. महाविद्यालयीन शिक्षण समाजकल्याण वसतीगृहात राहून पुर्ण केले. डीएड करुन टीईटीच्या दोन्ही परिक्षा उत्तीर्ण असतांनाही शिक्षक भरती झाली नाही. त्यामुळे सुनिताने एमपीएससीव्दारे अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले.
महागणपती करियर फाउंडेशन पुणे (रांजणगाव) येथे स्पर्धा परिक्षांसाठी दाखला घेताला. याठिकाणी अभ्यास करुन दुसऱ्याच प्रयत्नात तिने यशाला गवसणी घातली. या तिच्या शैक्षणिक प्रवासात आर्थिक विवंचनेमुळे सुनिता गायकवाड यांना शेतमजुरीही करावी लागली. मात्र जिद्द व चिकाटीच्या जोरावर तीने परिस्थितीवर मात केली.
माझी मुलगी दिव्यांग असल्यामुळे तिची नेहमी काळजी वाटायची.आम्ही आडाणी असतांनाही तिने मिळवलेल्या यशाने डोळ्यांतून नकळत आनंदाश्रू वाहू लागले. मुलीने नाव कमावले यातच खुप आनंदी असल्याचे वडील पोपट गायकवाड यांनी सांगीतले.