नाशिक- प्रलंबित वेतन करार पूर्ण करावा या मागणीसाठी नाशिकमधील एचएएल कामगारांचे साखळी उपोषण सुरू आहे. याच साखळी उपोषणाकडे लक्ष वेधण्यासाठी आज येथील कामगारांनी एचएएल प्रवेशद्वारावर मुंडन आंदोलन केले. मुंडन आंदोलन करूनही मागणी पूर्ण न झाल्यास लाक्षणिक संपाचा इशाराही या कामगार संघटनांनी दिला आहे.
'एचएएल' कामगार संघटनेचे प्रलंबित वेतन करारासाठी उपोषण; लक्ष वेधण्यासाठी मुंडन आंदोलन - Rakesh Shinde
एचएएल कामगार संघटनेचे प्रलंबित वेतन करारासाठी साखळी उपोषण सुरू आहे. आज संघटनेकडून मुंडन आंदोलन करण्यात आले. जर लवकरात लवकर यावर तोडगा निघाला नाही. तर लाक्षणिक संप पुकारण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
एचएएल म्हणजे भारतीय वायुसेनेचा कणा आहे. अनेक युद्धांमध्ये एचएएलच्या लढाऊ विमानांनी भारताला खंबीर साथ दिली आणि भारताने युद्धही जिंकले. त्याच एचएएलच्या कामगारांना आज पगारवाढीसाठी उपोषण करण्याची वेळ आली आहे. १ जानेवारी, २०१७ पासून कामगारांचा वेतन करार व्हायला हवा होता. परंतु जवळपास ३० महिन्यांपासून यावर कोणतीही समाधानकारक वाटचाल होत नाही. त्यामुळे आज सकाळी सात वाजेपासून कामगार संघटनेचे प्रतिनिधी साखळी उपोषणाला बसले आहेत.
कामगार संघटना २ दिवस उपोषण करणार असून व्यवस्थापनाने जर सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर १८ जुलै रोजी एचएएल कामगार संघटना एक दिवसीय लाक्षणिक संप करणार असल्याची माहिती संघटनेचे नेते सचिन ढोमसे आणि भानुदास शेळके यांनी दिली आहे