नाशिक :कोरोनामुक्त झाल्यानंतर सुद्धा अनेकांना इतर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनानंतर निर्माण झालेल्या नैराश्याने केस गळतीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रोटीनयुक्त आहार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
इतर आजारांबरोबर केस गळतीही
महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार केला. अशात लाखो जणांना कोरोनाची बाधा झाली होती. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तर काही जण मरणाच्या दारातून परत आले. मात्र या काळात मोठ्या प्रमाणात शरीरावर औषधांचा मारा झाल्याने त्याचे साईट इफेक्ट्स दिसू लागले आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनमुळे अनेकांना मधुमेह आजाराने ग्रासले आहे. तर अतिरिक्त औषधांमुळे आणि मानसिक तणावामुळे इतर आजारांबरोबर केस गळतीचीही समस्या निर्माण झाली आहे.
कोरोना मुक्तीनंतर मधुमेहाचाही त्रास जास्त
नाशिकच्या गंगापूर रोड भागात राहणारे 65 वर्षीय दीक्षित सांगतात (नाव बदलले आहे) मला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाची बाधा झाली. या काळात मला जास्त त्रास झाला. एचआरसिटी स्कोर 16 असल्याने मला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी मला सहा रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आले. सहा दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो. सुरवातीपासून मला मधुमेहाचा त्रास होता. मात्र कोरोना मुक्तीनंतर अधिक प्रमाणत वाढला. आता मी इन्शुलिन घेत आहे. तसेच आता केसगळतीची नवीन समस्या मला भेडसावत आहे. केसगळतीमुळे माझे केस विरळ झाले आहेत. यावर उपचार देखील सुरू आहेत.
केसांची निगा कशी ठेवणार?
कोरोनानंतर अनेकांना केस गळतीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोना काळात रेमडेसिवीर आणि इतर औषधांमुळे या समस्या निर्माण होत आहेत. यावर उपाय म्हणून जे मांसाहार करतात त्यांनी प्रोटीनसाठी चिकन, मासे, अंड्यांचा आहारात वापर करावा. जे शाहाकारी आहेत, त्यांनी आहारात प्रोटीनयुक्त पालेभाज्यांचा वापर करावा. त्याचबरोबर मानसिक तणावापासून दुर राहून पुरेपूर झोप घ्यावी. आठवड्यातून दोनदा केसांना तेल लावून शिकेकाई लावून आंघोळ करावी, असा सल्ला डॉ. वृषाली व्यवहारे यांनी दिला आहे.
हेही वाचा -मंत्रालयात झाले मोठे फेरबदल; एकाचवेळी ३०० अधिकाऱ्यांच्या बदल्या