नाशिक -राजस्थानहून नाशिकच्या दिशेने बेकायदेशीररित्या गुटखा घेऊन येणाऱ्या दोन कंटेनरवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 1 कोटी 64 लाख, 34 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल नाशिक ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे.
गुटख्यासह पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त; चार जणांवर वणी पोलिसांची कारवाई
राज्यात अवैधपणे गुटखा वाहतुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. नाशिकमध्ये वणी पोलिसांनी गुटख्यासह पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा गुटखा राजस्थानवरून नाशिककडे आणला जात होता.
1 कोटी 24 लाख रुपयांचा गुटखा जप्त -
राजस्थानहून नाशिककडे दोन कंटेनर अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानूसार शनिवारी रात्री करंजखेड परिसरात सापळा रचून पोलिसांनी 2 कंटेनर ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता प्रतिबंधित गुटखा पोलिसांना सापडला. महेंद्रसिंह सोलंकी, श्यामसिंह राव, अर्जुनसिंह राणावत आणि लोगलजी मेहवाल (रा. राजस्थान) या चौघांना वणी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 1 कोटी 24 लाख रुपयांचा गुटख्यासह एकूण 1 कोटी 64 लाख 34 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पुढील तपास पोलीस करत असल्याचे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.