नाशिक : हिंदुधर्मात गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्व आहे. गुढीपाडव्याला धर्मशास्त्रात विशेष महत्त्व आहे. या दिवशी धर्म ध्वज पूजा आणि ब्रह्म पूजा केल्यास याचा लाभ वर्षभर होतो, असे पुराणात सांगितले असल्याचे महंत अनिकेत देशपांडे यांनी सांगितले आहे. ब्रह्मपुराणात आणि भविष्य पुराणात व्रतराज ग्रंथात सांगितले आहे की ब्रह्मदेवाने चैत्रशुद्ध प्रतिपदेच्या सकाळी ब्रह्म मुहूर्तावर समस्त सृष्टीची निर्मिती करून आणि काल गणना याच दिवशी पासून सुरू केली आहे.
नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्याने : महंत अनिकेत देशपांडे यांनी गुढीपाडव्याचे महत्व सांगितले आहे. ते म्हणाले की, गुढीपाडव्याच्या तिथीला सर्व कर्मकृत्य, दृश कर्म याचा नाश करावा व मनशांती साठी सर्वांनी प्रार्थना करावी, सकाळी ब्रह्मदेवाची पूजा झाल्यानंतर फले, घटकी, प्रहर इत्यादी सर्व कालविभागांची, विष्णू देवाची महापूजा करावी, हवन करून समिधा प्रविष्ट कराव्यात, ब्राह्मण भोजन करावे आणि यथाशक्ती देणग्या द्याव्यात. ज्या चैत्र शुद्ध प्रतिपदा येते त्या दिवसाच्या वाराच्या अधिपतीची पूजा करावी. यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी बुधवार येत असून बुध ग्रहाची पूजा करावी, घरातील सर्व माणसांनी सकाळी तेलअभ्यंगन स्नान करून कडुलिंबाचे कवळे पाण ग्रहण करावे.
पौराणिक कथा : गुढी उभारण्याच्या पुराणात अनेक कथा आहेत. या दिवशी श्रीलंकेत रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र सीतामाईला घेऊन अयोध्येला परतले होते. यादिवशी अयोध्येतील नागरिकांनी विजय पताका लाऊन त्यांचे स्वागत केले होते. तसेच याशिवाय याचदिवशी विष्णू देवतेने मस्त्यावतार धारण केला होता, असेही पुराणात सांगण्यात येते.