नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून रुग्णसंख्या दुपटीने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महानगरपालिका रुग्णालयांवर नागरिकांचा विश्वास वाढवा यासाठी नाशिक मनपाच्या पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली.
प्रतिक्रिया देताना पालमंत्री छगन भुजबळ हेही वाचा -नाशिक ऑक्सिजन दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची आर्थिक मदत
कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी केले मनपा रुग्णालयात लसीकरण
नाशिक जिल्ह्यातील वाढता कोरोनाबधितांचा आकडा पाहता सर्वांनीच लसीकरण करून घेत हा वाढता धोका कमी करण्यास प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन सातत्याने जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत होते. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाविषयी अनेक अफवांना उधाण आल्याने अनेक जण लसीकरण करून घेण्यास तयार नसल्याने त्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी, तसेच महापालिकेच्या रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढावे म्हणून पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेल्या इंदिरा गांधी रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. तसेच, लसीकरणामुळे कोणताही त्रास होत नसून नागरिकांनी नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जास्तीत जास्त नागरिकांनी मनपा रुग्णालयात लसीकरण करून घ्यावे - पालकमंत्री
दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या मुंबई येथील निवासस्थानी उपचार घेतले. मात्र, कोरोना प्रतिबंधक लस घेणे गरजेचे असल्याने त्यांनी आज नाशिक महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात जाऊन लसीकरण करून घेतले. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार समीर भुजबळ यांनी देखील लसीकरण केले असून जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा -सलग दुसऱ्या वर्षी राम नवमीला काळाराम मंदिर भाविकांसाठी बंद