नाशिक - 'पुणे-नाशिक रेल्वे मार्गात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना जमिनीच्या बदल्यात 5 पट मोबदला मिळवून देण्यात येईल. कुठल्याही शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. शासन या शेतकऱ्यांना योग्य ते सहकार्य करेल', असे आश्वासन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक-पुणे रेल्वे मार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्ठमंडळाला दिले. तालुक्यातील नाणेगाव व परिसरातील शेतकऱ्यांच्या शिष्ठमंडळाने आज (14 जून) छगन भुजबळ यांची नाशिक येथील कार्यालयात भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन दिले.
'जमिनीचा योग्य मोबदला मिळावा'
'नाणेगाव येथे पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे भूसंपादन व अधिग्रहीत शेतजमिनीचे मोजणीचे काम सुरु आहे. हे भूसंपादन गावातील २१.५ हेक्टर बारमाही बागायती क्षेत्राचे होणार आहे. या क्षेत्रात द्राक्षे, कांदा, ऊस, फळझाडे व इतर बागायती नगदी पिके घेतली जातात. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व भौगोलिक नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी बारमाही बागायती आहेत. तसेच उदरनिर्वाहाचे साधन शेतीच आहे. त्यामुळे जमिनीचा योग्य मोबदला मिळावा', अशी मागणी भुजबळांना दिलेल्या निवेदनात केली आहे.