येवला (नाशिक) - ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी आपापल्या गावाचा विकास करण्यासाठी गावातील सर्वांना सोबत घेऊन एकसंघ राहून काम करावे, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित उमेदवारांचा सत्कार
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आज विविध ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित उमेदवारांनी आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची येवला संपर्क कार्यालयात भेट घेतली. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी विजयी उमेदरांचा पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते.
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा पालकमंत्री छगन भुजबळांच्या हस्ते सत्कार नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा पालकमंत्री छगन भुजबळांच्या हस्ते सत्कार हेही वाचा -'ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणाचा पेच सरकारने सोडवावा, अन्यथा..'
गावाच्या विकासासाठी एकत्र या
छगन भुजबळ म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेचा ग्रामपंचायत हा महत्त्वाचा कणा असून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामपंचायत हे महत्त्वाचं केंद्र आहे. प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंपूर्ण झाली तर त्यांचा परिणाम हा राज्याच्या विकासावर होत असतो. नागरिकांना प्राथमिक सुविधा पुरविण्याचे काम ग्रामपंचायतीतून होत असते त्यामुळे याठिकाणी काम करतांना एकमेकांमधील मनभेद, पक्षभेद बाजूला ठेऊन गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याची आवश्यकता असून त्यातून सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
देवना सिंचन प्रकल्पाला मंजुरी मिळल्याने शेतकऱ्यांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार
येवल्याच्या ईशान्य दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या देवना सिंचन प्रकल्पाच्या १२ कोटी ७७ लक्ष रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली. त्याबद्दल राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवत सोनवणे यांच्यासह शेतकऱ्यांनी आज येवला संपर्क कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांचे आभार मानले.
हेही वाचा -वाहनचालकांना दमदाटी करून पैसे उकळणाऱ्या 13 तृतीयपंथीयावर कारवाई