नाशिक - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आला आहे. अनेक संकटांवर मात करून उभे केलेले द्राक्ष पीक विक्रीच्या तोंडावर शेतातच पडून आहे. कोरोनामुळे जागतिक बाजारपेठा बंद पडल्या आहे. स्थानिक बाजारपेठा खुल्या असूनही द्राक्ष खरेदी करायला ग्राहकच नसल्याने राज्यातील हजारो हेक्टरवरील लाखो टन द्राक्ष फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
नाशिकच्या मातोरी गावातील सुदाम पिंगळे यांची तब्बल आठ एकर द्राक्ष शेती ही एक्सपोर्ट क्वालिटीची आहे. आस्मानी आणि सुल्तानी संकटांचा सामना करत पिंगळे यांनी द्राक्ष बागेतील पीक जिवंत ठेवले. मात्र, आता कोरोनाच्या जागतिक संकटामुळे पिंगळे यांची द्राक्ष खरेदी करण्यास कुणी तयार नाही. जागतिक बाजारपेठा बंद आहेत त्यामुळे निर्यातदार व्यापाऱ्यांनी शेतकऱयांची द्राक्ष खरेदी करण्यास नकार दिला आहे.