नाशिक -जिल्ह्यात जुलै ते नोव्हेंबर दरम्यान अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे हंगामपूर्व द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले. याचा जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागला. मात्र, अशा प्रतिकुल परस्थितीतही बागलाण तालुक्यातील तांदुळवाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी सुभाष भामरे व सचिन भामरे या पितापुत्रांनी मात्र नैसर्गिक आपत्तीवर मात केली. त्यांनी या अवकाळी संकटांशी दोन हात करत आपल्या मेहनतीच्या आणि कौशल्याच्या जोरावर तीन एकरातील द्राक्ष बागेला नुकसानीपासून वाचवले आहे.
हेही वाचा... अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल; म्हणाल्या ‘ठाकरे’ नाव लावून...
भामरे यांनी आपली द्राक्ष बाग या आपत्तीतून फक्त वाचवली नाही. तर, जवळपास ३० टन निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करून ३० ते ३१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यांचे हे यश इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे आहे. तालुक्यात इतर शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांचे नुकसान झालेले असताना, भामरे यांची ही बहरलेली द्राक्ष बाग सध्या चर्चेचा व आकर्षणाचा विषय ठरत आहे. त्यांच्या या बागेला जिल्ह्यातील शेतकरी भेट देत असून त्यांचे कौतुक करत आहेत.