नाशिक -महाशिवरात्री निमित्ताने आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर तब्बल 39 तास खुले राहणार आहे. मात्र, गर्भगृहात प्रवेश करुन दर्शन बंद राहणार आहे.एवढेच नव्हे तर या वर्षी (दि. 28 फेब्रुवारी ते 2 मार्च)पर्यंत विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वत्र ब्रेक द चेन असल्यामुळे कोरोनाचे नियम पाळून या कार्क्रमात भाविकांना भाग घेता येणार आहे. यावेळी मंदिरावर आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे.
पालखी सोहळा
महाशिवरात्री रोजी दुपारी 3 वाजता भगवान त्र्यंबक राजाची पालखी मंदिरातून निघून पारंपारिक मार्गाने तीर्थराज कुशावर्तावर षोडशोपचार पूजा करुन सायंकाळी 5 वाजेपर्यंत पालखी पुन्हा देवस्थान मध्ये येणार आहे. तसेच, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे (दि. 1 मार्च)रोजी परंपरेनुसार श्रीत्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगावर लघुरुद्र अभिषेक करण्यात येणार आहे. तर रात्री 11 वाजता भगवान त्र्यंबक राजाची पालखी फक्त मंदिर प्रांगणात मिरवण्यात येईल. तसेच, दिवसभरात मंदिरात आरती, महापूजा, अभिषेक सारखे धार्मिक कार्यक्रम पारपडणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम
महाशिवरात्री निमित्त श्रीत्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे तीन दिवसांकरिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात कथ्थक नृत्याचा कार्यक्रम, कीर्तन, संगीत मैफिल, शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सारखे संस्कृती कार्यक्रम होणार आहे.