नाशिक - कांदा अत्यंत कवडीमोल भावाने विकला जात असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. केंद्र सरकारने 15 मार्चच्या मुहूर्ताची वाट न पाहता तातडीने निर्यात बंदी उठवावी. तसेच बाजार हस्तक्षेप योजना लागू करून कांद्याला किमान २५०० रुपये हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी केली आहे. या मागणीसाठी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 वरील चांदवड येथील चौफुलीवर संतप्त शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
कांद्याच्या निर्यात धोरणांबाबत केंद्रातील भाजप सरकारच्या धरसोड वृत्तीमुळेच जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याला व्यापाऱ्यांकडून मागणी कमी होत आहे. कांद्याला उप्तादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अस्मानी संकटामुळे हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आलेल्या सुलतानी संकटाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता केंद्रातील भाजप सरकारने तातडीने कांद्यासह सर्व शेतमालाला हमीभाव जाहीर करून दिलासा द्यावा अन्यथा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी दिला आहे.