नाशिक -अनलॉकमध्ये शासनाने सर्वच व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, तरीही व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोर जावे लागत आहे. नाशिक शहरातील उद्योगांना ऑक्सिजन पुरवणाऱ्या कंपन्यांना आता फक्त कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवण्याचे आदेश मिळाले आहेत. त्यामुळे ऑक्सिजन अभावी नाशिकमधील गॅरेज व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
कोरोना इफेक्ट : ऑक्सिजनअभावी गॅरेज व्यावसायिक संकटात - नाशिक गॅरेज व्यावसायिक न्यूज
कोरोनामुळे राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. सर्व ऑक्सिजन पुरवणाऱ्या कंपन्यांनी फक्त रुग्णालयांना पुरवठा करावा, असे आदेश शासनाचे आहेत. परिणामी ऑक्सिजनचा वापर असणारे इतर उद्योगधंदे संकटात आले आहेत.
सर्व व्यवसाय सुरळीत व्हावेत म्हणून शासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल, असा यामागे उद्देश आहे. मात्र, नाशिकच्या गॅरेज व्यावसायिकांवर अद्यापही उपासमारीचीच वेळ आली आहे. कारण गॅरेजच्या वेल्डिंग, वायरिंग, डेंटिंग, पेंटिंग याकामांसाठी ऑक्सिजनची गरज असते. मात्र, ऑक्सिजन पुरवणाऱ्या सर्वच कंपन्यांना शासनाने फक्त कोविड रुग्णांसाठी रुग्णालयानांचा ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गॅरेज व्यावसायिकांना ऑक्सिजन मिळत नाही. परिणामी त्यांची कामे थांबली आहेत. कामगार व इतर कर्मचाऱ्यांचे पगार देणे सुद्धा गॅरेज मालकांना शक्य होत नाही. याचा शासनाने विचार करून गॅरेज व्यावसायिकांना थोडीतरी मदत करावी, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.