नाशिक- मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने न्यायालयीन कामकाज झाल्यावर पुन्हा कारागृहात जाताना चक्क अंडरपॅन्टमध्ये गांजा लपवून आणल्याची बाब समोर आली आहे. याबाबत कारागृह प्रशासनाने नाशिक रोड पोलीस ठाण्यात संशयित कैद्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात गांजा, कैद्याने याठिकाणी लपवून आणला आत - गुन्हा दाखल
मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने न्यायालयीन कामकाज झाल्यावर पुन्हा कारागृहात जाताना चक्क अंडरपॅन्टमध्ये गांजा लपवून आणल्याची बाब समोर आली आहे.
कैदी नंबर 471 सुनील चांगले (रा हनुमान वाडी, पंचवटी, नाशिक) याला 11 जूनला दुपारी न्यायालयात नेण्यात आले होते. न्यायालयाचे कामकाज संपल्यावर दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास या कैद्याला पुन्हा कारागृहात पाठवण्यात आले असताना कारागृहातील झडती अंमलदार विजयसिंह निकम, गेट कीपर रामकिसन बोधने, ज्ञानेश्वर दळवी यांनी संशयित सुनील चांगले याची झडती घेतली. यावेळी त्याने तंबाखूच्या पुडीमध्ये गांजा टाकून चिकट टेप लावून अंडरपॅन्टमध्ये लपवलेला सापडला. विजयसिंह निकम यांना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची माहिती तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर चव्हाण यांना सांगितली, घटनेचे गांभीर्य ओळखून संशयित सुनील चांगले याच्याविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
यापूर्वी देखील नाशिक सेंट्रल जेलमध्ये अमली पदार्थ, मोबाईल सापडण्याच्या घटना समोर आल्या आहेत.