महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik Crime: नाशिकमध्ये शिंदे-ठाकरे गटात राडा; हवेत केला गोळीबार, एक जण ताब्यात - शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर सुनावणी

देवळाली गावातील गणेश मंदिर सार्वजनिक पार येथे आयोजित शिवजयंतीच्या बैठकीदरम्यान ठाकरे आणि शिंदे गटात बाचाबाची होऊन एकाने थेट हवेत गोळीबार केल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. देवळाली गावात दंगाविरोधी पथक दाखल झाले आहे. बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेनंतर शिंदे गटातील एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

Rada in Shinde-Thackare group
शिंदे-ठाकरे गटात राडा

By

Published : Jan 20, 2023, 11:35 AM IST

देवळाली गावात शिंदे-ठाकरे गटात राडा

नाशिक : नाशिकमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शिवजयंती उत्सवासाठी बैठक सुरू असताना दोन्ही गट कोयते, तलवारी, लाठ्या-काठ्या काढून एकमेकांवर धावून गेले. याची माहिती पोलिसांना मिळताच उपनगरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी हे पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले.जमावाला रोखण्यासाठी लाठीमार केल्याचे समजते. या घटनेमुळे तणावाची स्थिती असून, परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. चौधरी यांनी दोन्ही गटाला समजाविण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटांनी आरोप-प्रत्यारोप केल्याने वाद व तणाव वाढतच गेला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत सचिन चौधरी यांनी वरिष्ठांना कळवले. पोलीस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त सिध्देश्वर धुमाळ, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माईनकर, नाशिकरोडचे अनिल शिंदे, देवळाली कॅम्पचे कुंदन जाधव तातडीने दाखल झाले. काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत वातावरण तणावपूर्ण होते. अशात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली.

दोन गटात वादविवाद :शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या देवळालीगावात काही दिवसांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. काही पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेना गटात दाखल झाले. तर काही पदाधिकारी नुकतेच ठाकरे गटात दाखल झाले आहेत.त्यातून दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.अशात भविष्यात दोन गटात वादविवाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कायदा हातात घेणाऱ्या कोणत्याही पक्षच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी,अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिक करत आहे.




एक जण ताब्यात :या बैठकीतील मागील शिवजयंती मिरवणूक खर्चाच्या अहवालावरून वाद झाला, दोनच दिवसापूर्वी माजी नगरसेवक भैय्या मणियार यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला असून त्यांची आणि शिंदे गट सेनेच्या गटात सक्रिय भूमिका निभवणाऱ्या लवटे यांच्या समर्थकांत हे वादविवाद झाल्याची किनार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेनंतर शिंदे गटातील एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्यांने गोळीबार केल्याची चर्चा आहे.

आज चिन्हावर सुनावणी :उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आज शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर सुनावणी पार पडणार आहे. आज काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या चिन्हाचा वाद महत्त्वपूर्ण सुनावणीच्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यातच नाशिकमध्ये शिंदे-ठाकरे गटात राडा झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

हेही वाचा : Shiv Sena Symbol News शिवसेना कोणाची पक्षचिन्ह उद्धव ठाकरे गटाकडे जाणार की एकनाथ शिंदे गटाकडे आज होणार सुनावणी

ABOUT THE AUTHOR

...view details