नाशिक :गावात तीन स्मशानभूमी असतानाही अंत्यसंस्काराविना मृतदेह पडून राहिला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अग्निडाग देऊन अंत्यविधी उरकल्याची ( Funeral In Front Of Gram Panchayat ) धक्कादायक घटना चांडवड तालुक्यातील खडकजांब गावात ( Khadakjamb Village Chandwad Nashik ) घडली.
खाजगी वादातून स्मशानभूमी बंद :खडकजांब येथील तीनही स्मशानभूमी खाजगी वादामुळे बंद आहेत. त्यामुळे गावात कोणाचा मृत्यू झाला तर ग्रामस्थ स्वतःच्या शेतात अंत्यसंस्कार करू लागले असून, ही आता या गावाची प्रथा झाली आहे. खडकजांब येथील अमोल अशोक कोकाटे (वय २५) या आदिवासी तरुणाचा शनिवारी (दि. १६) मृत्यू झाला. त्यांना जमीन नसल्याने आता अंत्यविधी करायचा कुठे? असा प्रश्न कुटुंबीयांना पडला. कुटुंबातील सदस्यांनी ग्रामपंचायत गाठली. अंत्यसंस्कार कुठे करायचे, असा प्रश्न विचारला. मात्र, प्रशासन व सरपंचांकडे याचे उत्तर नव्हते. आप्तेष्टांनी दहा तास सरकारी कार्यालयांत खेटे घातले. अनेक जागा शोधल्या. मात्र, अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा काही मिळेना. अखेर शोधाशोध करून ग्रामपंचायतीसमोरच कसाबसा अंत्यविधी उरकला. गावाच्या स्मशानभूमीची जागा मोकळी होईल का? की वेळोवेळी आदिवासी, दलित, मागासवर्गीय कुटुंबातील नागरिकांना अंत्यविधीसाठी ग्रामपंचायत गाठावी लागेल, असा प्रश्न विचारला जात आहे.