महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! पैशासाठी घटस्फोट, विवाहितेचे दुसरे लग्न लावण्याची आखली योजना - मालेगावात घटस्फोट

गरीब मुलीशी लग्न करून तीला घटस्फोट देत पैशासाठी तिचा विवाह वयस्कर व्यक्ती लावून देण्याचा प्रयत्न मालेगावात घडला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

रमजानपुरा पोलीस ठाणे
रमजानपुरा पोलीस ठाणे

By

Published : Feb 10, 2020, 8:55 PM IST

नाशिक- लग्न हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अविस्मरणीय सुखदायी क्षण असतो. पण, नाशिकच्या मालेगाव शहरातील एका तरुणीसाठी हाच क्षण अत्यंत धक्कादायक ठरला आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तिला घटस्फोट देत पैशासाठी दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न लावून देण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणी रमझानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

माहिती देताना पीडिता व पोलीस

याबाबत पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही परभणी येथील एका गरीब कुटुंबात राहणारी असून लग्न जमवणारी मध्यस्थी शबाना नूर या महिलेने तिचे मालेगाव येथील इमरान शेख याच्यासोबत लग्न जुळवले. 30 जानेवारी रोजी इमरान शेख याच्यासोबत तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर तिला घेऊन इमरान आणि शबाना रेल्वेने संध्याकाळी मालेगावला निघाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे ते मालेगावात पोहोचले. इमरानने त्या तरुणीला कामासाठी मला जाणे गरजेचे आहे, असे म्हणत शबानाकडे तिला सोडून तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर दोन दिवसांनी तो परत आला आणि माझे लग्न झाले असून मला दोन अपत्ये असल्याचे सांगत धमकावून तिला दोघांनी मारहाण केली. बळजबरीने तिच्याकडून घटस्फोटाच्या कागदांवर सह्या घेतल्या. सायंकाळी तिला एका खोलीत कोंडून निघून गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा परत येत मारहाण केली. तिने आई-वडिलांना बोलण्यासाठी दोघांना फोनची मागणी केली. पण, फोन न देता तिला जीवे मारण्याची धमकी त्या दोघांनी दिली आणि परत कोंडून बाहेर गेले. त्यावेळी तिचे दुसऱ्या एका वयस्कर व्यक्तीशी लग्न लावून त्यांच्याकडून पैसे घेणार असल्याची त्यांची योजना असल्याचे पीडितेला समजले.

हेही वाचा - विजेचा धक्का लागून दोन तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू

लग्नानंतर मुलीने संपर्क न केल्याने तिच्या आई-वडिलांना चिंता वाटू लागली. मग ते मालेगावातील त्यांच्या मोठ्या मुलीला शोध घेण्यास सांगितले. त्यानंतर पीडितेचा शोध सुरू केला. त्यावेळी शहरातील मलदा कॉनलीमध्ये एका खोलीत मुलगी असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनतर तिच्या आई-वडिलांनी तेथे जाऊन मुलीची सुटका केली. भयभीत असलेल्या तरुणीने सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. सुरुवातीला काही तांत्रिक बाबींमुळे पोलीस दखल घेत नव्हते. त्यानंतर काही सामाजिक संघटना पुढे आल्या आणि पोलिसांना घटनेचे गांभीर्य सांगितले. मुलीच्या तक्रारीवरुन इमरान शेख आणि शबाना नूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून इमरानला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शबाना नूरचा शोध सुरू आहे. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झाली नसून पोलीस याचा तपास करत आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

मालेगाव शहरात गरीब मुलींचे लग्न वयस्कर व्यक्तीसह लावून देणे. नंतर लग्न मोडत खंडणी वसूल करणे, असे प्रकार सुरू होते. अशा प्रकारच्या घटनेची पहिल्यावेळीच तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

हेही वाचा -नाशकात पोलीस ठाण्याच्या आवारातच महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

ABOUT THE AUTHOR

...view details