नाशिक -कृषी विभागाच्या विविध योजना मंजूर करून घेत त्यांच्या खोट्या निविदा काढून सुमारे 147 शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांनीच गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 2011 ते 2017 या कालावधीत हा प्रकार झाला आहे. यात तब्बल 50 कोटींची फसवणुक झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी घेतली दखल
पेठ तालुक्यात 2011 ते 2017 या कालावधीत बोगस कामे व कागदपत्रे दाखवून कृषी विभागाच्या सुमारे 16 अधिकाऱ्यांनी इतर नागरिकांनी सहा वर्षांत शासनाची सुमारे 50 कोटी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी एक ट्रॅक्टर चालक शेतकरी योगेश सापटे याने थेट न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश पेठ तालुका पोलिसांना दिले आहेत. यातील काही अधिकारी हे सेवानिवृत्त झाले आहेत. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित कृषी अधिकाऱ्यांचा सहभाग तसेच गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता, ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी हा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग केला आहे.