नाशिक - रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाप्रशासनाकडून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. रुग्णालयांनी मेलद्वारे ऑनलाइन फार्म भरुन मागणी केल्यावर त्यांना इंजेक्शन उपलब्ध करुन दिले जात आहे. मात्र, रुग्णाचा नातेवाईकांकडून परस्पर हा ऑनलाइन फार्म भरला जात असून त्यासाठी चार हजार वैयक्तिक मेल नियंत्रण कक्षाला प्राप्त झाले आहे. या प्रकरामुळे नियंत्रण कक्षाचा वेळ वाया जात असून वैयक्तिक इ-मेल करणार्यांना इंजेक्शन मिळणार नाही, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट सांगितले आहे.
मेडिकलमध्ये आता रेमडेसिवीर मिळणार नसून त्यासाठी रुग्णालयांना एक ऑनलाइन फॉर्म भरावा लागणार
कोरोनाबाधितांची वाढ झाल्याने रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीर इंजेक्शन वितरकांकडून विकत घेत होते. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आले. बाराशे रुपयांचे इंजेक्शन दहा ते वीस हजारांपर्यंत विकले जात होते. साठेबाजीमुळे रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला. इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण होत होती. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांची घटना व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली. तसेच थेट मेडिकलमध्ये आता रेमडेसिवीर मिळणार नसून त्यासाठी रुग्णालयांना एक ऑनलाइन फार्म उपलब्ध करुन देण्यात आला आहे.