नाशिक - सटाणा रोडवर विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सटाणा येथील रहिवाशी शंकर यादवराव बोडके हे कारने (क्र. एमएच ०२, १७४०) मधून बळसाने (दुसाने) ता. साक्री येथून लग्नानिमित्ताने दुपारी दिघावे (ता.साक्री) येथे लग्नाला जात होते. त्यावेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार दिघावे फाट्यावरील एका विहिरीत पडली. या घटनेत बोडके कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला
पत्नी आणि मुले गेल्याने त्यांना काहीच सुचेना
कार चालवत असणारे शंकर बोडके (रा. सटाणा) हे कारमधून सुखरूप बाहेर पडले. परंतु त्यांची पत्नी गौरी बोडके (वय ३५), मुलगी श्रद्धा (वय १५), मुलगा तन्मय (वय १२) व दिघावे येथील नात्यातील युवती भूमिका योगेश पानपाटील (वय १२) हे पाण्यातच मृत झाले. चालक शंकर बोडके घडलेल्या प्रसंगाने इतके घाबरले होते, की त्यांना एक तास काहीच सुचले नाही, एका ठिकाणी बसून केवळ पाहत राहिले.