नाशिक - जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे बुधवार २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा समोर आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. यातच, आज (गुरुवार) जायखेड्यात पुन्हा ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दिवसागणिक रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय ठरत असून, एकट्या जायखेड्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३२ वर पोहोचला आहे.
बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे ३६ व्यक्तींनी मालेगाव येथे खासगी तपासणी केली होती. यापैकी ३३ जण निगेटिव्ह आले असून, तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच नाशिक येथे वैयक्तिकरित्या उपचारासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची यादी तयार करून त्यांना विलगीकरण केंद्रात पाठवण्याच्या तयारीत आरोग्य विभाग लागले आहे. तर, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या कळत नकळत संपर्कात आलेल्या व्यक्तींचे धाबे दणाणले असून, कोरोनाच्या भीतीने अनेकजण स्वतःहून पुढाकार घेत आपल्या चाचण्या करून घेत आहेत. यात अनेकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने, कुटुंबीय व संपर्कातील व्यक्तींनी सुटकेचा श्वास सोडला आहे. तर, काहींचे अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने चिंतेत अधिकच वाढ झाली आहे.