नाशिक-जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शनिवारी दिवसभरात तब्बल 413 जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे. काल रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने पाच हजाराचा टप्पा पार केला आहे.
शनिवारी वाढलेल्या रुग्णांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक 286, नाशिक ग्रामीणमध्ये 117, मालेगाव 10 येथील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे मृत्यूचा आकडा 270 वर जाऊन पोहोचला आहे.
गेल्या 15 दिवसात नाशिक शहराची रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढत आहे. शहरातील बाधितांची संख्या 2780 झालीये. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा आता 5187 वर पोहोचला आहे.त्यामुळे कोरोना प्रसार रोखण्यासाठी नाशिककरांनी आता प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.
शनिवारी नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मालेगावातही दहा नवे कोरोनाबाधित आढळले असून येथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 76 वर कायम आहे.