मनमाड- कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या मनमाड शहरात 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच 10 नवे रुग्ण आढळून आल्याने शहरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 64 झाली असून यापैकी 51 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या 9 जणांवर उपचार सुरू आहेत.
मनमाडला 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू; 10 नवीन रुग्ण आढळल्याने खळबळ - नागरिकांच्या हलगर्जीपणाने वाढले मनमाडमध्ये रुग्ण
मनमाड शहरात 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच 10 नवे रुग्ण आढळून आल्याने शहरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. मनमाड शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 64 झाली असून यापैकी 51 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
शहरातील मृत कोरोनाबाधित रुग्णांच्या घरातील जवळपास 30 जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. उद्या त्यांचेही अहवाल प्राप्त होतील. प्रशासन एवढी काळजी घेत असताना नागरिक हलगर्जीपणा करत आहेत. अनेक ठिकाणी विनाकारण गर्दी करणे, काम नसताना गावात फिरणे, मास्क न वापरणे, यामुळे देखील संसर्ग वाढत आहे. आता पावसाळ्याच्या दिवसात नव्याने रुग्ण वाढण्याची शक्यता देखील डॉक्टरांनी बोलून दाखवली आहे. मृत बाधितांपैकी चौथा व्यक्ती हा बाहेर गावातील असल्याने प्रशासनावर अजून ताण पडत आहे.
शहरातील दुकाने सम-विषम पद्धतीने सुरू आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या शेजारील परिसरात औषध फवारणी करुन तेथे कन्टेनमेंट झोन करण्यात आले आहेत. तेथील नागरिकांना घरपोच जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. ही साखळी तुटावी म्हणून सायंकाळी 5 नंतर संचारबंदी देखील लावण्यात आलेली आहे. तरीही नागरिकांनी जागरुक राहून स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांनी केले आहे.