नांदगाव (नाशिक) - मी राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री असताना बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांवर काम करतोय आणि भविष्यात देखील जोपर्यंत सर्व बंजारा समाजाचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत पाठपुरावा करत राहील. या कामात मला सर्वानी पक्ष भेद सोडून साथ द्यावी असे आवाहन माजी वनमंत्री संजय राठोड यांनी केले आहे. नांदगाव येथील बंजारा समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते.
'मला साथ द्या'
यावेळी बोलताना राठोड म्हणाले की, मला कोणते पद नकोय, यासाठी मी फिरतनसून आतापर्यंत 12 जिल्ह्यांत मी समाजाचे मेळावे घेतले अजून उर्वरित जिल्ह्यात देखील जाऊन बंजारा समाजाच्या अडीअडचणी जाणून त्या शासनदरबारी मांडून मागण्या मान्य करून घेणार आहे. यासाठी मला साथ द्या असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मंचावर नांदगांव तालुक्याचे आमदार सुहास कांदे व राष्ट्रीय बंजारा समाजाचे कार्यकारणी सदस्य के सी राठोड उपस्थित होते.
'मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करणारा कार्यकर्ता'
सध्या खूप घाणेरड्या पध्दतीने राजकारण सुरू असून माझ्यावर देखील आरोप करण्यात आले होते. त्यामुळे मी स्वतः राजीनामा दिला. जेव्हा चौकशी पूर्ण होईल तेव्हा पुन्हा पद द्या असे स्पष्ट सांगितले आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करणारा साधा कार्यकर्ता असून जेव्हा त्यांना वाटेल, तेव्हा ते मला कॅबिनेट मंत्री करतील असेही यावेळी ते म्हणाले.