स्टेडियमच्या रखडलेल्या कामाविषयी बाळा दराडे व अंनिसची प्रतिक्रिया नाशिक : नवीन नाशिक भागातील राजे संभाजी स्टेडियम येथे उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किरण दराडे यांच्याकडून केंद्र शासनाच्या 'खेलो इंडिया' या उपक्रमांतर्गत 6 कोटी खर्च करून भव्य क्रीडांगण व इतर सुविधांसाठी कामे करण्यात येत होती. परंतु, अनेक अडथळ्यांमुळे ते पूर्ण होत नव्हते. तीन ठेकेदार काम करत होते. त्यात एकाचा कोरोनामुळे तर दुसऱ्याचा आजारपणामुळे मृत्यू झाला. काम रखडल्यामुळे खर्च वाढल्याने आधीच्या किंमतीत ते काम करण्यास तिसऱ्या ठेकेदाराने असमर्थता दर्शवली.
स्टेडिअममध्ये वास्तूपूजा : राजे संभाजी स्टेडियमचे आतापर्यंत फक्त दीड कोटीचे काम झाले असून पुढील काम थांबवण्यात आले आहे. त्यात आता पालिकेने आणखी 3 कोटीचा निधी या कामासाठी मंजूर केला आहे. त्यामुळे त्यात तब्बल 9 कोटी रुपये खर्च करून हे काम होणार आहे. वास्तूदोषामुळे काम पूर्ण होत नसल्याचे कारण देत माजी नगरसेविका किरण दराडे व त्यांचे पती बाळा दराडे यांनी या ठिकाणी वास्तूपूजा केली. त्यानंतर या ठिकाणी म्हसोबा महाराजांचा प्रसाद म्हणून बोकड बळी देण्यात आला. तसेच परिसरातील नागरिकांना जेवण देण्यात आले.
अंधश्रद्धेच्या कृत्याचा निषेध : सिडको परिसरातील माजी नगरसेविका व त्यांचे पती त्यांच्याच प्रभागातील एक अपूर्ण काम वर्षानुवर्षे पूर्ण होत नसल्याने ते आता तरी सुरळीत व्हावे म्हणून त्यांनी बोकड बळी दिला आहे. आहार कोणता असावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु, नवसापोटी बोकडबळी ही अंधश्रद्धा आहे. महाराष्ट्र अंनिस नवसापोटी पशुबळीला त्यामुळेच विरोध करते. शासकीय कामे व्हावे यासाठी योग्य मार्ग न अवलंबता समाजात अंधश्रद्धा वाढीस लावण्याचे हे कृत्य केले असल्याने 'अंनिस' त्याचा निषेध करत आहे, असे 'अंनिस'ने म्हटले आहे.
म्हणून आम्ही वास्तूपूजा केली : अनेक दिवसांपासून स्टेडियमचे काम रखडले आहे. या ठिकाणी आधी म्हसोबा महाराजांचे मंदिर होते, असे म्हटले जाते. काही नागरिकांनी म्हटले की, या ठिकाणी वास्तुपूजा केली पाहिजे. त्यामुळे आम्ही ही पूजा केली आहे आणि या कारणाचे जेवण ठेवले आहे. काम होण्यासाठी आम्ही काहीही करू शकतो, असे माजी नगरसेविका यांचे पती बाळा दराडे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा:
- Bombay High Court: विशाळगड परिसरात जर बेकायदेशीर पशुबळी होत असेल तर ते खपवून घेणार नाही- न्यायालय
- Dog Killed : अंधश्रद्धेचा कळस! चक्क कुत्र्याला दगडावर आपटत दिला बळी
- अंधश्रद्धेने घेतला बळी : हरियाली अमावस्येच्या दिवशी दशामातेच्या पूजेच्या कार्यक्रमात कापला चुलत बहिणीचा गळा