नाशिक - जिल्ह्यातील टाकळी बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील ६ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली. या सहाही जणांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. रोहीयाबाई सोर (वय ६०), गंगाराम शिवतडे (वय १०), वसंत सुळ(वय ९), गोटूराम सुळ (वय ११ ), सागर सुळ (वय ४ ), लंका आयनोर (वय ८) असे विषबाधा झालेल्या या ६ जणांची नावे आहेत.
माहितीनुसार, टाकळी बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील ६ सदस्यांनी कोथिंबीर घातलेल्या भाकरी खाल्ल्या होत्या. त्यानंतर, त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास व्हायला लागला. हा त्रास वाढत असल्याचे लक्षात येताच त्यांना रुग्णवाहिकेतून नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळीच उपचार करण्यात आल्याने त्यांचा जीव वाचला. सध्या या सहाही जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पालेभाज्यावर फवारण्यात येणाऱ्या कीटकनाशकामुळे ही विषबाधा झाल्याची शक्यता डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.