नांदगाव (नाशिक) - नांदगांव शहरात रविवारी (दि. 31 मे) सकाळी एका 62 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर सायंकाळी त्या महिलेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाचे तर धाबे दणाणले. काही दिवसांपूर्वी त्या महिलेस कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर तिचे सॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, अहवाल प्राप्त होण्याच्या आधीच तिचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी उशिरा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्वांची धावपळ उडाली आहे.
महिलेच्या अंत्यसंस्कारावेळी कोणकोण उपस्थित होते. तसेच मृतदेहाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील कोरोनाचा पहिला बळी नागरिकांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरीच रहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या आता 15च्या वर गेली असून काही अहवाल प्राप्त होणे बाकी आहेत.
काही दिवसांतच पावसाळा सुरू होईल; पावसाळ्यात वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला, ताप यासारखे साथीचे आजार डोके वर काढतात. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो, असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. आता नांदगांव शहरातील चार ठिकाण कंटेंनमेंट म्हणून घोषित करण्यात आले असून चार बफर झोन तयार करण्यात आले आहेत. तसेच प्रशासनाने शहरात रिक्षा फिरवून नागरिकांना आवाहन करण्याचे काम सुरू केले आहे. ज्या ठिकाणी रुग्ण आढळले त्या भागात सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळी सॅनिटायझरची फवारणी करुन परिसर निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू आहे.
पालिकेच्या वतीने सर्व उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी साथ दिली तर, लवकरच नांदगांव शहर व तालुका कोरोनामुक्त करू, असे मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचक्के यांनी सांगितले. तालुक्यातील मनमाड, नांदगाव या शहरासह ग्रामीण भागात काही कोरोनाबाधित आढळले. त्यांनतर लॉकडाऊनसारखे पर्याय करण्यात आले. मात्र, नागरिक कोरोनाच्या बाबतीत गंभीर नसल्याने पोलीस, पालिका आणि तहसील विभाग हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे.
हेही वाचा -मालेगावच्या जीवनचक्राची चाके पुन्हा सुरू, यंत्रमाग सुरू करण्यास परवानगी