नाशिक - शहरातील मखमलाबाद रस्त्यावर भरदिवसा एका युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली. किरण भडंगे असे या जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्या डाव्या हाताला गोळी लागली आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
भरदिवसा युवकावर गोळीबार; नाशिकमधील प्रकार नाशिकमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. नाशिकमध्ये गेल्या आठ दिवसात दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्यानंतर आज (सोमवारी) म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्व वैमनस्यातून एकावर गोळीबार झाल्याची घटना घडली.
हेही वाचा -होळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त, तळीरामांवर अंकुश ठेवण्यासाठी नाकेबंदी
मखमलाबाद रस्त्यावर उदयनगरच्या चौकात एका इस्त्रीच्या दुकानात किरण भडंगे हा शर्ट इस्त्री करण्यासाठी आला होता. त्याच्यावर अज्ञात दोघांनी गावठी कट्ट्याच्या माध्यमातून गोळीबार केला. यात त्याच्या डाव्या हाताला गोळी लागली आहे. तर त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हल्लेखोर आणि जखमी या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. दरम्यान, जखमी किरण भडंगे याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार आहे. तसेच ज्यांनी हल्ला केला तेदेखील सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच फॉरेन्सिक लॅबला पाचारण करण्यात आले आहे. संशयित हल्लेखोर फरार झाले आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी नाका बंदी केली आहे. तर पुढील तपास सुरू आहे.